दरवर्षी आषाढ महिन्यात वीरशैव गवळी समाजातर्फे लक्ष्मी यात्रा साजरी होते. त्यानिमित्ताने म्हशींना सजवून सार्वजनिक रस्त्यावरून पळविले जाते. परंतु सध्या करोनाकाळात निर्बंध जारी असतानाही रस्त्यावरून म्हशी पळविण्यात आल्याने त्याची दखल घेऊ न पोलिसांनी संबंधित अकरा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील अक्कलकोट रस्त्यावर सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे म्हशी पळविणे गवळी समाजबांधवांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या विरूध्द प्राणी संरक्षण कायद्यासह आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याखाली जेलरोड पोलिसांनी कारवाई केली आहे. संबंधितांना अटकही झाली आहे.
वीरशैव गवळी समाजाचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मी आईची यात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात भरविली जाते. यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हजारो भाविकांना महाप्रसादही दिला जातो. यात्रेची सांगता विविध मार्गावर म्हशी पळविण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने होते.
तथापि, सध्या करोनाकाळात कोणत्याही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रशासनाकडून परवानगी दिली जात नाही. मात्र तरीही गवळी समाजाने अक्कलकोट रस्त्यावर महालक्ष्मी मंदिर ते र. ग. कर्णिक नगर सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या संख्येने म्हशी पळविल्या. त्या वेळी शेकडोंची गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा स्त्री-पुरुषांसह आबालवृद्ध थांबले होते. परंतु आकर्षक सजवलेल्या म्हशी पळविताना रस्त्यावर थांबलेल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली. म्हशींना जोरात पळविताना लाकडी दांडक्यांसह चाबकांनी अमानुष मारहाण करून मुक्या जनावरांचा क्रुरपणे छळ केल्याचे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गणेश बंडू खंडेराव (वय ३२, रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्यासह अकरा जणांना आरोपी करण्यात आले आहे.
