महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांचा खासगी बस वाहतुकीकडे वाढलेला ओढा कमी करण्यासाठी सातत्याने विविध प्रयत्न केले जातात. रात्रीच्या वेळी प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून २०१९ च्या वर्षअखेरीस परिवहन मंडळाच्या ताफ्यात तीस आसनांसह पंधरा शयनयान असलेल्या विनावातानुकूलित बसगाडय़ांचा समावेश करण्यात आला. एसटीची रातराणी बस म्हणून या बसगाडय़ा धावत आहेत. ठाणे आगारातून धावणाऱ्या आठ रातराणी बसगाडय़ांमधून ठाणे परिवहन विभागाला महिन्याकाठी ५८ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
कोकणातून मुंबई व मुंबई उपनगरांत येणाऱ्या एसटीच्या रातराणी बस चाकरमान्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. कालांतराने खासगी बससेवेचा दर्जा आणि गुणवत्ता तसेच तिकीट दर यामुळे हा वर्ग आपसूकच खासगी बस वाहतुकीकडे ओढला गेला. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास प्रवासी आरामदायी बसगाडय़ांना पसंती देतात. यामुळे अनेक प्रवासी खासगी बस वाहतुकीला प्राधान्य देतात. घटलेली प्रवासी संख्या वाढविण्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून मागील काही वर्षांपासून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीदेखील दिल्या जात आहेत. प्रवाशांची गरज ओळखून परिवहन मंडळाने मागील काही वर्षांत शिवनेरी, शिवशाही आणि अश्वमेध यांसारख्या आसनी आणि झोपण्यासाठी सुविधा असलेल्या बसगाडय़ांचा ताफ्यात समावेश करून घेतला आहे. रातराणी म्हणून नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या गाडय़ांमध्ये तीस आसनांसह पंधरा शयनयानांची एकत्रित सोय करण्यात आली आहे. दोन्ही सोयी एकाच गाडीत असल्यामुळे प्रवासी याला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी पुरेशी जागा, सामान ठेवण्यासाठी दोन मोठे कक्ष, गाडीच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेले एलईडी मार्गफलक, आपत्कालीन परिस्थितीत वाजणारे भोंगे, आगप्रतिबंधक उपकरणे, वाचनासाठी आसनाजवळ दिवे, हवेच्या दाबावर उघडझाप होणारा प्रवासी दरवाजा यांसारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा या गाडय़ांमध्ये उपलब्ध आहेत.
ठाणे आगारातून उमरगा, अंबेजोगाई आणि निलंगा या भागांत जाण्यासाठी रोज आठ गाडय़ा धावत आहेत. सायंकाळी सातनंतर या गाडय़ा आपल्या प्रवासाला निघतात. सातशे ते आठशे रुपयांपर्यंत याचे प्रवास दर आहेत. खासगी वाहतूकदारांकडून सद्य:स्थितीत समान दर आकारले जात आहेत. मात्र एसटीचे दर हे स्थिर असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एसटीच्या या रातराणी सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ठाणे परिवहन विभागाला चांगले उत्पन्न मिळत आहे.
ठाणे विभागातून सुरू असलेल्या रातराणी
ठाणे-उमरगा – ४ बसगाडय़ा
ठाणे-अंबेजोगाई – २ बसगाडय़ा
भिवंडी-निलंगा – २ बसगाडय़ा
रातराणीचे उत्पन्न आणि प्रवास
(कालावधी १ जुलै २०२१ ते ३० जुलै २०२१)
प्रवास – १ लाख १९ हजार किलोमीटर
उत्पन्न – ५७ लाख ६२ हजार रु.
