म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त, दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत निघणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी… परवडणारं घरं घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकेल. कारण तब्बल तीन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त मिळाला आहे. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे मुंबई लगतच्या भागांत परवडणारी घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे. यापूर्वी 2018 साली म्हाडाच्या घरांची सोडत निघाली होती. पंतप्रधान आवास योजनेतील 6500, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर 20 टक्के योजनेतील 500 घरांचा या सोडतीत समावेश आहे.

यंदा दसऱ्याला म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत निघणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. पण आता मात्र ही सोडत काढण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे.  2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती. यंदाच्या दसऱ्याला 9000 घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचं म्हाडाकडून जाहीर करण्यात आलं आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर इथे ही घरं असतील.

मुंबई आणि लगतच्या उपनगरांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण, बऱ्याचदा मुंबईत घरं घेणं परवडत नाही. पण म्हाडाच्या सोडतीमुळं आता ते शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *