तळीये गावातील आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जातील. त्यांचे पुनर्वसन याच गावात केले जाईल, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ही वसाहत बांधून दिली जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी दिली. राणे यांनी रविवारी महाड येथील तळीये गावाला भेट दिली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर उपस्थित होते.
आपदग्रस्त कुटुंबांचे याच गावात, ते सुचवतील त्या जागेवर पुनर्वसन केले जाईल. त्यांना पक्की घरे बांधून दिली जातील. त्यासाठी केंद्र सरकारकडून जी मदत लागेल ती दिली जाईल, इथली शासकीय यंत्रणा चांगले काम करत आहेत. पण त्याच वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी एका उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी सूचना जिल्हाधिकारी यांना केली असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारला कोकणातील परिस्थितीबाबत सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे ते म्हणाले.
कालच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीये येथील आपदग्रस्तांना म्हाडा मार्फत घरे बांधून देण्याची घोषणा केली होती. आता केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून आपदग्रस्तांना घरे देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तर पंतप्रधान आवास योजनेबरोबरच एनडीआरएफच्या निधीतून घर बांधणीसाठी अनुदानही देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
