गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करुन आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मंगळवारी रात्री हिंसक वळण लागले.
या आंदोलनाचे नेतृत्व करणा-या २२ वर्षीय हार्दिक पटेलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुजरातमधल्या अनेक भागात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. अहमदाबाद, सूरत, मेहसाणा आणि राजकोट या भागात मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला.
अनेक भागांमध्ये रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. सूरतमध्ये सरकारी बसेसची जाळपोळ करण्यात आली. सूरतमध्ये पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या कापोदरा, सरथाना आणि वराच्छा या भागामध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. अहमदाबादमध्ये नऊ पोलिस स्थानकांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
गुजरातमधल्या मोरबीमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणा-या हार्दिक पटेलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तासाभरातच सोडून दिले. त्याने पटेल समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
हार्दिक पटेलने बुधवारी गुजरात बंदची हाक दिली असून, अहमदाबादमध्ये शाळा, महाविद्यालये बंद रहाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी चर्चा केली असून, केंद्राकडून अतिरिक्त सुरक्षापथके पाठवण्यात येणार आहेत. आता शांतता असली तरी, तणावपूर्ण स्थिती कायम आहे. अफवांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संपूर्ण गुजरातमध्ये मोबाईलवरील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे

