कोल्हापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात सापडला असून पुणे ते बेंगळुरू हायवेसह जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. सकाळी महापुरात वाहून जाणाऱ्या ३६ जणांना एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप वाचवले. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरात पाणी घुसू लागल्याने स्थलांतराला वेग आला आहे. पन्हाळ्याला जाणारा रस्ता खचला असून चिखली गावात पुराचे पाणी घुसले आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातही महापुराचा धोका वाढला आहे. दरम्यान पंचगंगा नदीचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून तब्बल ४९ फुटांवरून वाहत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २४ तास सलग पाऊस कोसळत आहे. पंचगंगेसह सर्व नद्यांना महापूर आल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी घुसत आहे. काल दोन दोघेजण वाहून गेल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफसह स्थानिक प्रशासन लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज सकाळी दोन ठिकाणी घडलेल्या घटनेत ३६ जणांना एनडीआरएफच्या पथकाने वाचवले.
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर, रत्नागिरीला निघालेली कर्नाटक राज्य परिवहनची बस राजपूतवाडी जवळ पाण्यात अडकली होती. बसमधील पुरुष, महिला व लहान मुले अशा एकूण २५ लोकांना बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना यश आले आहे. ही बस पाण्यात बुडाली. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे पांगीरे येथे पुलावर नाशिक येथे निघालेली प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर अडकली होती. यात ११ लोक अडकले होते, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
