अमेरिकेतही भाव खातेय नाशिकची मिसळ

नाशिकची वाइन प्रसिद्ध आहे, तितकीच नाशिकची झणझणीत मिसळदेखील. आता अमेरिकेतही नाशिकची मिसळ तेथील खवय्यांच्या पसंतीला उतरत आहे. तर्री अन् मिसळपावची सजलेली डिश पाहून अमेरिकेतील भारतीयांसह तेथील स्थानिकांच्याही तोंडाला पाणी येत आहे. नाशिकची सून असलेल्या दीप्ती कासरळीकर यांनी जॉर्जियात ‘एमएच १५’ नावाने सुरू केलेल्या हॉटेलमध्ये खवय्ये मिसळवर मनसोक्त ताव मारत आहेत.

मूळच्या विदर्भातील दीप्ती या लग्नानंतर सासरी नाशिकला आल्या. त्याआधी त्यांनी नाशिकच्या मिसळबद्दल अनेकदा ऐकले होते. परंतु, लग्नानंतर नाशिकल्या आल्यावर मिसळवर ताव मारला. पहिल्यांदा खाल्ल्यानंतरच त्या मिसळच्या प्रेमात पडल्या. वर्षभराने अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांना नावीन्यपूर्ण काहीतरी करावे, असे वाटत होते. स्वयंपाकाची आधीपासूनच आवड असल्याने हॉटेल सुरू करण्याचा निर्धार केला. अमेरिकेत इतर सर्व महाराष्ट्रीयन पदार्थ होते. पण मिसळ मात्र उपलब्ध होत नव्हती. म्हणून त्यांनी घरच्या घरी मिसळ बनविण्यास सुरुवात केली.

जानेवारी महिन्यात त्यांनी हॉटेलचा शुभारंभ केला. दीप्ती यांनी आपल्या हॉटलचे नाव ‘एमएच १५’ असे ठेवले आहे. यामध्ये वडापाव, कांदाभजी, बटाटाभजी, व्हेज कोल्हापुरी, बटर मसाला, फ्युजन, नॉर्थ इंडियन, पनिर बटर मसाला यांसारखे अनेक पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांसह इतर राज्यातील लोक व परदेशी लोकांच्याही हे पदार्थ विशेष पसंतीस उतरत आहेत. यातही त्यांच्या खास नाशिकच्या मिसळची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *