ऑनलाइन वाहन परवाना सुविधेला अल्प प्रतिसाद

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या शहरांतील साडेपाच हजार नागरिकांनी ऑनलाइनद्वारे, तर १६ हजारांहून अधिक नागरिकांनी थेट कार्यालयात जाऊन शिकाऊ वाहन परवाना घेतला आहे. गेल्या महिनाभरातील या आकडेवारीमुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना सुविधेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे उघड झाले असून त्याचबरोबर नागरिक कार्यालयात जाऊनच परवाना घेण्यास प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

परवाना काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाबाबत असलेली अनभिज्ञता, ऑनलाइनद्वारे आवश्यक कागदपत्रे जमा करताना संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणी, वेळेत न येणारा ओटीपी यांमुळेच ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना सुविधेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवानासंबंधीच्या कामासाठी नागरिक दररोज मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये शिकाऊ  वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ  वाहन परवाना काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या महिनाभरापासून ही योजना राज्यात राबविली जात आहे.

परवाना मिळविण्याच्या या प्रक्रियेत अर्ज भरतेवेळी अनेकदा संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण होणे, सर्व्हर डाऊन असणे, वेळेत ओटीपी न येणे तसेच मोबाइल क्रमांकाशी आधार क्रमांक संलग्न नसणे या कारणांमुळे परवाना मिळविताना नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तांत्रिक अडचणींबरोबरच अद्याप अनेक नागरिक ऑनलाइन सुविधेविषयी अनभिज्ञ असल्याची एक प्रमुख बाब समोर येत आहे. शिकाऊ  वाहन परवान्याकरिता ऑनलाइन अर्ज दाखल करून शुल्क भरले तरी वेळेत ओटीपी येत नाही. बराच काळ ताटकळत थांबावे लागते. काही वेळेस शुल्क भरल्यानंतरची प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागते, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. यामुळे ऑनलाइन शिकाऊ  वाहन परवाना कसा काढावा, याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने नागरिक या सुविधेचा लाभ घेतील, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ऑनलाइन वाहन परवाना मिळवण्यासाठी काही नागरिकांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. परंतु परवाना मिळविताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत असून या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने परवाना मिळवण्यासाठी अर्जदाराने कोणतेही गैरकृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. – जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *