दीर्घ विश्रांतीनंतर नवी मुंबईत गेले दोन दिवस पावसाचे आगमन झाले असून सोमवारी दिवसभरात २०.९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र यावर्षी कमी पाणीसाठा असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सोमवारी दिवसभरात अधूनमधून पाऊस सुरू होता. सकाळच्या सत्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर दिवसभर रिपरिप सुरूच होती. सकाळपासून सायंकाळ पाच वाजेपर्यंत शहरात सरासरी २०.९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
धरणात ४२.१० टक्के साठा
नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण अद्याप रिकामेच आहे. कमी पावसामुळे धरणात अद्याप ४२.१० टक्के पाणीसाठा आहे. हा साठा शहरासाठी पुरसा असला तरी पुढील काळात पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास पाणी नियोजन करावे लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर पाणी कपात करण्याची वेळ येणार आहे. हे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. जुलै महिन्यात सलग पाऊस पडला नाही तर धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. सध्या स्थितीला ४२.१० टक्के पाणीसाठा असून ७४.७५ मीटर पाण्याची पातळी आहे. धरणात ८०.३८१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल.
पाणीसाठा
२०१८ : २५ जुलै (पूर्ण भरले)
२०१९ : ४ ऑगस्ट (पूर्ण भरले)
२०२० : ९५ टक्के
