सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी अनुक्रमे गणेशमूर्ती आणि देवीची मूर्ती साकारून त्यांची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांनाच मुंबईत मंडप उभारण्यास ऑफलाइन पद्धतीने परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्रतयार मूर्ती बाहेरून आणून केवळ त्यांच्या विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे तयार गणेशमूर्तीची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर भाड्याने जागा घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव जवळ येऊ लागताच मुंबईत ठिकठिकाणी पदपथ आणि रस्त्यावर मंडप उभारून गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात येतात. काही मूर्तिकार मंडप उभारून तेथे गणेशाची अथवा देवीची मूर्ती साकारतात आणि तेथेच त्यांची विक्री केली जाते. तर काही मंडळी बाहेरगावातून मूर्ती आणून मुंबईत त्यांची विक्री करतात. याबाबत मूर्तिकारांनी नाराजी व्यक्तकेली होती.
गेल्या काही वर्षांपासून तयार मूर्तींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेकडून मंडप परवानगी नाकारण्यात येत आहे. यंदाही या व्यावसायिकांना मंडप उभारण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मूर्तिकारांना ऑनलाइन पद्धतीने मंडप परवानगी देण्यास सुरुवात केली होती. मात्र ऑनलाइन अर्ज करताना मूर्तिकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता यंदा मूर्ती घडवून त्यांची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना ऑफलाइन पद्धतीने मंडप परवानगी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात विविधस्तरीय शुल्काचा समावेश आहे. हे परिपत्रक पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये आणि पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधितांनी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis या लिंकवर संपर्क साधावा. सर्व संबंधितांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
