चंद्रपूर जिल्हय़ातील मद्यालये उघडली

चंद्रपूर : जिल्हय़ातील मद्यप्रेमींसाठी सोमवार दिवस हा आनंदाचा ठरला आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिअर बार, देशीविदेशी दारू दुकाने, बिअर शॉपी सुरू होताच मद्यप्रेमींनी मद्याचा घोट घेत आनंद द्विगुणित केला. करोना नियमावलीमुळे सायंकाळी चार वाजताच मद्यालये बंद झाल्याने बिअर बार समोर मद्यप्रेमींची गर्दी बघायला मिळाली.

पोलीस मुख्यालया समोरील हॉटेल सिद्धार्थ, हॉटेल तंदूर, हॉटेल पॅलेस, मूल मार्गावरील हॉटेल मोतीमहल, मनोरंजन तथा इतर अन्य बिअर बार तथा देशी दारू दुकाने सुरू झाली. पहिल्या दिवशी वेळेत दारू पोहचू न शकल्याने सकाळी सुरू होणारी मद्यालये दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुरू झाली. करोना नियमावलीमुळे सायंकाळी ४ वाजता ती बंद करण्यात आली. पहिल्याच दिवशी मद्यशौकिनांनी बिअर बारमध्ये गर्दी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सोमवारी एकूण ९८ अर्जावर आदेश पारित केले आहेत. ही प्रक्रिया अशाच पद्धतीने जलद गतीने सुरू ठेवून निर्णय घेण्यात येणार आहे.

दारू व चहा एकाच दिवशी

शहरात सोमवारी दारू व चहाचे दुकान एकाच दिवशी सुरू झाले. एकीकडे मद्यालये सुरू होत असतानाच शहरात आझाद बगिच्याजवळील येवले चहा या पुण्याचा नामांकित चहाचे दुकान येथे सुरू झाले. एकीकडे थंड बिअर तर दुसरीकडे गरम चहाचा योगायोग येथे जुळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *