ब्लॅक फंगसमुळे डोळा निकामी झाल्याने विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) जवानाने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली ही थरारक घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास झिंगाबाई टाकळीतील निवारा हाऊसिंग सोसायटी येथे घडली. या घटनेने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रमोद शंकरराव मेरगुवार वय ४६,असे मृतकाचे नाव आहे.
प्रमोद हे मूळ ग्रामीण पोलिस दलात तैनात आहेत. काही वर्षांपूर्वी ते प्रतिनियुक्तीवर एसपीयूत आले. दरम्यान त्यांना करोना झाला. करोनानंतर ब्लॅक फंगसने त्यांच्या डोळ्याला इजा झाली. आधी त्यांच्यावर अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथेही पुढील उपचारासाठी पाढविण्यात आले. त्यांचा एक डोळा निकामी झाला.
दरम्यान त्यांच्या दुसऱ्या डोळ्यालाही त्रास होऊ लागली. ते प्रचंड तणावात राहायला लागले. वेदना असह्य होत होत्या. शनिवारी दुपारी प्रमोद यांनी पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार, मानकापूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी प्रमोद यांचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
