कर्करोगावरील उपचारापासून अतिवृद्ध रुग्णांपर्यंत सर्व प्रकारच्या अतिविशेषोपचाराची व्यवस्था असलेले अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय नजीकच्या काळात ठाणे शहरात उभे राहणार आहे. तब्बल ९०० खाटा असलेल्या दहा मजली रुग्णालयाच्या छतावर हवाई रुग्णवाहिका उतरण्याची व्यवस्थाही असणार आहे. यासाठी जवळपास ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या संकल्पित रुग्णालयाच्या तळघरात केमोथेरपी व रेडिएशनचे उपचार केले जाणार असून तळमजल्यावर अपघात विभाग, ट्रॉमा सेंटर तसेच सिटी स्कॅन आदी अत्यावश्यक चाचण्यांची व्यवस्था असणार आहे. पहिल्या मजल्यावर प्रयोगशाळा, रक्तपेढी तसेच त्यासंबंधी अन्य व्यवस्था असणार आहे. दहा मजल्यांच्या या रुग्णालयात एकूण २० शस्त्रक्रियागृहे असणार आहेत. ९०० खाटा वेगवेगळ्या विभागांत असून महत्त्वाचे म्हणजे ३० खाटांचा वयोवृद्धांसाठी स्वतंत्र विभाग येथे सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय ४० डायलिसिस मशिनचा स्वतंत्र विभाग तसेच त्याला लागून डायलिसिसची आवश्यकता असलेल्या मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी प्रतीक्षालय असेल. १० मजल्यांवरील विविध विभागांची रचना करताना जगभरातील अत्याधुनिक रुग्णालयाच्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
सुरुवातीला रुग्णालयाचा विकास करताना चार चटईक्षेत्रफळ उपलब्ध होईल, असे गृहीत धरून ५७४ खाटांच्या रुग्णालयाची रचना करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जिल्हा रुग्णालय विकासाबाबत झालेल्या बैठकीत ५.८० एवढे चटईक्षेत्र उपलब्ध होऊ शकते असे ठाणे महापालिकेने स्पष्ट केल्यानंतर त्यादृष्टीने रुग्णालयाचा स्थापत्य आराखडा तयार करण्यास शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी तळ अधिक सहा मजले तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह विकासाचे आराखडे आम्ही तयार केले होते. या प्रकल्पासाठी सुमारे ३१४ कोटी खर्च अपेक्षित होता तर साधारणपणे साडेतीन लाख चौरस फूट बांधकाम होणार होते. तथापि चटईक्षेत्र वाढल्यामुळे सात लाख चौरस फूट बांधकाम करणे शक्य होणार असून याअंतर्गत ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. केवळ ठाणे शहरच नव्हे तर ठाणे जिल्ह्य़ासाठी हे रुग्णालय सर्वार्थाने जीवनदायी बनेल, असा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला.
आजघडीला कर्करोगापासून अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांना मुंबईकडे धाव घ्यावी लागते. नवीन ठाणे जिल्हा रुग्णालयामुळे केवळ ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यातील रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळणार आहेत. कर्करोगावरील केमोथेरपी व रेडिएशन उपचार, जवळपास सर्व प्रकारच्या चाचण्या, मेंदू, हृदयविकार, महिलांचे आजार, बालकांचे आजार, मानसिक आजारांपासून सर्व प्रमुख आजारांवर येथे उपचार होतील तेही सर्वोत्तम असे डॉ. पवार म्हणाले. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ३ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णालयाच्या विकासाबाबत एक बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. या नियोजित रुग्णालयाच्या छतावर हवाई रुग्णवाहिका उतरण्याची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
ग्लोबल इंजिनीअरिंग सव्र्हिसेस यांनी या रुग्णालयाचे वास्तुशास्त्रीय आराखडे तयार केले असून वाढीव चटईक्षेत्र उपलब्ध असल्याचे स्पष्ट होताच अत्यंत वेगाने नवीन आराखडे तयार करण्यात आले. रुग्णालयाचे कामही असेच वेगाने व नियोजित वेळेत पूर्ण केले जाईल, असा विश्वास डॉ पवार यांनी व्यक्त केला.
१९३६ मध्ये नारायण विठ्ठल सायन्ना यांनी सध्याची इमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती. रुग्णालयाची इमारत आता खूपच जुनी झाल्यामुळे नव्याने रुग्णालयाचा विकास होणे जसे गरजेचे होते तसेच ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही गरज बनली होती. ९०० खाटांच्या या नियोजित १० मजली रुग्णालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार असून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबरोबरच १० मजली परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह हेही उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पवार यांनी सांगितले.
