रामबन या जम्मु काश्मीर राज्यामधील जिल्ह्याध्ये दहशतवाद्यांनी दडवून ठेवलेला मोठा शस्त्रास्त्र व दारुगोळ्याचा साठा शोधण्यात सुरक्षा दलास यश आले आहे. रामबन जिल्ह्यामधील थटरका गावामधील गूल भागामध्ये हा शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आल्याची नेमकी माहिती मिळाल्यानंतर लष्कर व पोलिस दलाने संयुक्तरित्या शोधमोहिम राबविल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने आज (मंगळवार) सांगितले.
या शोधमोहिमेदरम्यान दारुगोळ्याचा मोठा साठा हाती लागला असला; तरी दहशतवादी सापडू शकले नाहीत. चिनी बनावटीच्या ग्रेनेडसह इतर प्रकारचे ग्रेनेड, एके रायफलींची काडतुसे, पाच किलोग्रॅम स्फोटके यांशिवाय इतरही अनेक प्रकारचा दारुगोळा व शस्त्रास्त्रे या शोधमोहिमेदरम्यान आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी एक तक्रार दाखल करुन घेतली आहे.
