बनावट करोना चाचणी अहवाल देणारे अटकेत

करोना चाचणीचा बनावट नकारात्मक (करोना नसलेला) अहवाल तयार करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचने बुधवारी अटक केली आहे. अफसर मंगवाना (३४) आणि संकपाल धवने (३४) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून हे दोघेही महापालिकेच्या करोना केंद्रात परिचर (वॉर्ड बॉय) म्हणून काम करतात. १२०० ते १३०० रुपयांना हे बनावट अहवाल तयार केले जात होते. करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचेही त्यांनी बनावट अहवाल तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी त्यांनी अशाप्रकारे किती जणांचे बनावट अहवाल तयार केले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

ठाणे महापालिकेद्वारे शहरात ठिकठिकाणी मोफत करोना चाचणी केली जाते. कामानिमित्ताने अनेकांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल लागत असतो. याचा गैरफायदा घेत ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील करोना केंद्रात परिचर म्हणून काम करणारा अफसर मंगवाना हा पैसे घेऊन बनावट नकारात्मक करोना अहवाल तयार करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याआधारे १४ मे या दिवशी पोलीस पथकाने खबऱ्यांमार्फत करोना आजाराने मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींचे आधारकार्ड मंगवानाला देऊन त्यांचे बनावट करोना

चाचणी अहवाल तयार करण्यास सांगितले. १८ मे ला मंगवानाने या दोन्ही मृतांचे आरटीपीसीआरचे करोना नकारात्मक अहवाल खबऱ्यांना दिले. बनावट करोना अहवाल तयार होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर युनिट पाचने मंगवानाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने महापालिकेच्या फिरत्या करोना चाचणी वाहनावर काम करणाऱ्या संकपाल धवने याच्या मदतीने हा प्रकार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संकपाल धवने यालाही ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *