म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत असून कर्करोगापेक्षाही जलदगतीने पसरणाऱ्या या आजाराच्या उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी करोना कृतिदलात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांची नियुक्ती राज्य सरकारने केली.
करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये अनियंत्रित साखरेची पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांचा अतिवापर या मुळे म्युकरमायकोसिस बुरशीजन्य संसर्गाचे बाधा होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या रुग्णांचे निदान वेळेत करणे आव्हानात्मक असून उपचारही योग्यरितीने करणे गरजेचे आहे. तेव्हा राज्यभरातील डॉक्टरांना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी करोना कृतिदलामध्ये ठाण्याचे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांचा समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
म्युकरमायकोसिस हा नवीन बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारपुढे नवीन आव्हान उभे ठाकले. त्याचा सामना करण्यासाठी डॉ. आशिष भुमकर यांच्यासोबत एक खास टीम तयार करण्यात आली आहे. यात डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम एकत्र करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढाकाराने हे संकट आपण सगळे मिळून नक्की परतवून लावू, असा विश्वास आशिष भुमकर यांनी व्यक्त केला.
म्युकरमायकोसिस आजार बळावल्यानंतर राज्य टास्क फोर्समध्ये नियुक्त झालेल्या डॉ. आशिष भूमकर यांनी मधुमेहग्रस्त रुग्णांची साखर पातळी नियंत्रणात ठेवणे हाच यावरचा सोपा उपाय असल्याचे सांगितले. त्यासोबत कोविड झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांना भूल देणे हे देखील एक मोठं आव्हान असल्याचं डॉ. भूमकर यांनी सांगितलं.
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगावर चर्चा करण्यासोबतच डॉ. भूमकर यांनी या व्हीसीमध्ये आशा रुग्णाच्या सर्जरीचं लाईव्ह प्रात्यक्षिक देखील आयोजित केल होत. या व्हीसी मध्ये सहभागी झालेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही सर्जरी नक्की कशी होणार याबाबत डॉक्टरांकडून सारी माहीती जाणून घेतली. त्यासोबतच या रोगावरील उपचारामधील अवघड बाबी देखील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या लक्षात आणून दिल्या.

