भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांमधील प्रशिक्षकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘द्रोणाचार्य‘ पुरस्कारासाठी पाच जणांची क्रीडा मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे.
क्रीडा मंत्रालयाने आज (मंगळवार) पाच जणांच्या नावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये कुस्तीचे प्रशिक्षक अनुप सिंग, पॅरालिंपिक प्रशिक्षक नवल सिंग, जलतरण प्रशिक्षक निहार अमीन, मुष्टियुद्ध प्रशिक्षक एस. आर. सिंग आणि ऍथलेटिक्स प्रशिक्षक हरबन्स सिंग यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे क्रीडापटू घडविणाऱ्या प्रशिक्षकांसाठी 1985 पासून द्रोणाचार्य पुरस्कार सुरू करण्यात आले होते. कुस्ती प्रशिक्षक अनुप सिंग यांनी सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, सत्यवर्त कॅडीयन, बजरंग, अमित दाहिया यांच्यासह 58 कुस्तीपटूंना मार्गदर्शन केलेले आहे. रोमियो जेम्स (हॉकी), प्रकाश मिश्रा (टेनिस) आणि टी. पी. पी. नायर (व्हॉलिबॉल) यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

