अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. रविवारपासून चक्रीवादळाचं स्वरूप तीव्र होत असल्याचं दिसून येत होतं.आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे.
केरळ, तामिळनाडू, गोवा किनारपट्टी ओलांडून तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं हळूहळू सरकू लागलं आहे. वादळाचा वेग ताशी २० किमी असून, वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वादळाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील काही तासांतील बदलामुळे हवामाने विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या चक्रीवादळाचं स्वरूप बदललं असून, वादळाने अतिरौद्र रुप धारण केलं आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, या जिल्ह्यांमध्येही दिसून येत आहे.
