“करोनाचं दुसरं वर्ष पहिल्यापेक्षा भयानक असेल”, जागतिक आरोग्य संघटनेनं दिला इशारा!

गेल्या वर्षभरात जगभरात करोनानं कहर माजवल्यानंतर आता कुठे जगातल्या काही देशांमध्ये परिस्थिती सामान्य होण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. भारतासारख्या काही देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आहे. जगभरात करोनावर संशोधित झालेल्या लसींमुळे आख्ख्या जगानं करोनाशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र वेगळाच इशारा दिला आहे. “कोविड-१९नं आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.

लसीचा पुरवठा हे प्रमुख आव्हान!

जगभरातल्या करोनाच्या संकटाबाबत डॉ. टेड्रॉस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातल्या करोनाच्या परिस्थितीसोबतच चालू वर्षात करोनाचा नि:पात करण्यासाठी कशा पद्धतीने पावलं उचलणं गरजेचं आहे, याविषयी जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका मांडली. “या काळामध्ये लसीचा पुरवठा हे एक सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. मात्र, जगातील काही प्रमुख लस उत्पादक देश यासंदर्भात इतर देशांना मदतीचं धोरण अंगीकारत असल्याचं पाहून मला आनंद होत आहे. काही देशांनी लसींचा साठा इतर देशांना पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच काही लस उत्पादक कंपन्यांनी लसीचा फॉर्म्युला देण्याचीही तयारी दर्शवली आहे”, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *