करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा देशाला बसला असून, संसर्ग प्रसाराच्या वेगाने आरोग्य व्यवस्थेला वेठीस धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत करोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. चार लाखांच्या पुढे रुग्णसंख्या नोंदवण्यात आली असून, गेल्या २४ तासांत यात घट झाल्याचं दिसून आलं. मात्र काळजीची बाब म्हणजे दररोज होणाऱ्या मृत्यू संख्येचा वेग कायम असल्याचं आकेडवारीवरून स्पष्ट झालं आहे.
देशातील दररोजच्या करोना परिस्थितीचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशभरात ३ लाख ७३२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर दिवसभरात तब्बल ३ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण करोना मृतांची संख्या २ लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
