कोविड संसर्ग : लहान मुलांना जपा, तिसऱ्या संभाव्य लाटेत मोठा धोका

कोविड संसर्गाचा (Covid infection) धोका सातत्याने वाढत आहे. कोरोना ( Coronavirus) तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुलांना कोविड संसर्गापासून लांब ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. दरम्यान, सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयात हलवावे जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे, असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.

प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये अशा विविध महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे संभाव्य  तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड तसेच विविध पालिका अधिकारीदेखील उपस्थित होते.

यावेळी शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षीप्रमाणे  यंदादेखील कोविडचा मुकाबला करताना इतर रोगांच्या रुग्णांनासुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लेप्टो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करताना या नॉन कोविड रुग्णांसाठीसुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *