संगमेश्वरला लुटले २९ लाखांचे सोने

संगमेश्वरला लुटले २९ लाखांचे सोने

मुंबईच्या दादर परिसरातील एका सुवर्णकाराचे सुमारे २७ लाख रुपयांचे दागिने व २ लाख रुपयांची रोकड असा एकूण २९ लाखांचा ऐवज असलेली बॅग चोरटय़ाने आराम बसमधून लांबवल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे शनिवारी रात्री उघडकीस आला आहे.

राकेश महेंद्र जैन यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार जैन यांचा सराफाचा व्यवसाय आहे. दादर भागात त्यांची पेढी आहे. ते शनिवारी रात्री सोन्याचे दागिने घेऊन औदुंबर ट्रॅव्हल्सच्या आराम बसमधून रत्नागिरीहून दादरकडे जात होते.

त्यावेळी मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथे मुकुंद कृपा हॉटेलमध्ये ते जेवणासाठी उतरले होते. तेव्हा त्यांच्याकडील बॅग त्यांनी बसमध्ये ठेवली होती. त्यावेळी बसमध्ये कुणी नसल्याची संधी साधून चोरटय़ाने ही बॅग लांबवली. यात जैन यांचे २७ लाख रुपये किमतीचे दागिने व २ लाखांची रोकड चोरीला गेली आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोहर चिखले अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आराम बसमधून २९ लाख रुपयांचा ऐवज चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. या प्रकारामुळे प्रवाशांत भीती पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *