भरतीचे पाणी रस्त्यावर

पुरंदरे खारभूमी योजनेच्या  पुन:प्रस्थापित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात आल्याने तसेच नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात बदल करून तो अरुंद केल्याने ३१ मार्च रोजी खाडीच्या उधान भरतीचे पाणी माकुणसार-पालघर मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रकार घडला.   या बाबत प्रशासनाने येत्या काही महिन्यांत ठोस पावले उचलली नाही तर पावसाळ्यात या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते.

माकुणसार येथील ६५ हेक्टर क्षेत्रांमध्ये पुरंदरे खारभूमी योजना १९५२ साली पूर्ण करण्यात आली.  भरतीचे खारे पाणी अडवून शेत जमिनी सुपीक करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते. या योजनेचा लाभ माकुणसार, विळगी, आगरवाडी व परिसरातील गावांना झाला आहे.  अलीकडच्या काळात येथील जमिनीची अनेकदा खरेदी-विक्री झाली असून जमीन विकत घेणाऱ्या मालकांनी दोन फुटांपेक्षा अधिक भराव न करण्याचे निर्बंध असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी चार फुटापेक्षा अधिक भराव केले आहेत.   ग्रामस्थानी अनेकदा तहसीलदार, ग्रामपंचायत आणि खारभूमी विभागाकडे या विरोधात तक्रारी केल्या आहेत. या बाबत खारभूमी विभागाने संबंधितांविरुद्ध ऑगस्ट २०१८ मध्ये नोटीस बजावून भराव काढण्याचे आदेश दिले होते.  मात्र  कारवाई झालेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढे या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात आणि मोठ्या भरतीमध्ये माकुणसार- पालघर  रस्ता पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

खाडीला येणारे मोठ्या उधाणाचे (भरतीचे) जे पाणी पूर्वी पुरंदरे खारभूमी क्षेत्राच्या  पुन:प्रस्थापित क्षेत्रात पसरत होते त्या क्षेत्रात माती भराव आणि बांध बांधले गेल्याने या पाण्याचा निचरा होत नसल्याने मार्ग बदलून ते पाणी माकुणसार- पालघर मुख्य रस्त्यावर येऊन रस्ता पाण्याखाली जात आहे.

उन्हाळ्यातील पहिलाच प्रसंग

३१ मार्च रोजी या रस्त्यावर दोन फुटापेक्षा अधिक पाणी रस्त्यावरील खोलगट भागात सुमारे तीन तास साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. उन्हाळ्यात आलेल्या खाडी भरतीमुळे रस्त्यावर पाणी साचल्याचा हा पहिलाच प्रसंग असून पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अवस्था अधिक बिकट होईल अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *