जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु त्याचे गांभीर्य शासनाला नाही. अशा अनेक समस्यांशी वाड्यातील पोलीसही सामना करीत असून येथील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत पडल्याने येथील सर्वच पोलिसांवर महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
वाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस ठाण्याच्या मालकीची दोन एकरहून अधिक जागा आहे. या जागेवर ६० वर्षांाूर्वी बांधलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची पूर्ण पडझड झाली आहे. सध्या या जागेला जंगलाचे स्वरूप आले आहे. येथे राहण्यायोग्य एकही खोली सुस्थितीत नसल्याने सध्या या जागेचा उपयोग गुन्हे कामात पकडलेल्या गाड्या ठेवण्यासाठी पोलीस खात्याकडून केला जात आहे.
या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले पोलीस अधिकाऱ्यांचे निवासस्थान व २७ हून अधिक खोल्यांची पडझड झाली आहे. उंदीर, घुशी, साप, डुकरे तसेच मोकाट जनावरे व कुत्री यांच्याकडूनच या निवासस्थानाचा सध्या उपयोग केला जात आहे. गेल्या दहा वर्र्षांपासून या निवासस्थानांची दुरवस्था झालेली असतानाही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानाच्या नव्याने करावयाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे.
निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी सध्या एकही पोलीस कुटुंब राहात नाही. ही निवासस्थाने सोडून येथील सर्व पोलिसांवर आज महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या घरभाड्याच्या तिप्पट रक्कम खासगी निवासासाठी देण्याची वेळ येथील ९५ पोलीस व ५ पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.
वाडा येथे पोलीस ठाण्यालगतच दोन एकर जागेत साठ वर्षांपूर्वी पोलीस व पोलीस अधिकारी यांच्यासाठी २७ निवासस्थाने (खोल्या ) बांधलेली चाळ होती. गेल्या ६० वर्षांत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अनेकदा दुरुस्त्या केल्याने या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपूर्वी काही पोलीस राहात होते. पण आता येथील सर्वच निवासस्थानांची इतकी पडझड झालेली आहे की, या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून एकही पोलीस कुटुंब राहात नाही.
वाडा पोलीस ठाणे हे ग्रामीण भागात येत असून या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पोलिसांना आपल्या पगारात घरभाडे म्हणून अवघे १५०० ते १७०० रुपये तर पोलीस अधिकारी यांना २३०० ते २८०० रुपये मिळतात. वाडा पोलीस ठाण्यात एकूण ९५ पोलीस व पाच पोलीस अधिकारी कार्यरत असून त्यांच्यासाठी वाडा शहरात एकही सरकारी निवासस्थान नसल्याने या पोलिसांना भाड्याने घरे घेऊन दरमहा घरभाड्यासाठी चार हजार ते सहा हजार रुपये द्यावे लागत आहेत. पोलीस निवासस्थानाअभावी प्रत्येक महिन्याला दोन ते चार हजार रुपये जास्त खर्च करण्याची वेळ येथील पोलिसांवर आली आहे.
जागे असूनही हालचाली नाहीत
वाडा येथे पोलिसांच्या निवासासाठी दोन एकर क्षेत्र असलेली जागा उपलब्ध आहे. ही जागा पोलीस ठाण्याच्या नावावर आहे. या जागेची साफसफाई करून या ठिकाणी भव्य निवासस्थान बांधले तर या ठिकाणी सर्वच पोलिसांसाठी अधिकाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था होऊ शकते. तसेच ही जागा पोलीस ठाण्यालगतच असल्याने पोलिसांसाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे. या जागेबाबत विचारविनिमय व्हावा अशी अपेक्षा पोलीस कर्मचाऱ्यांची आहे.
वाडा पोलीस ठाण्याच्या नावावर असलेल्या या जागेवर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव सुरू असून लवकरच तो मार्गी लागेल. – सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, वाडा
