श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रनिल विक्रमसिंगे यांनी शुक्रवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधानपदी ते चौथ्यांदा विराजमान झाले आहेत.
सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रपती सचिवालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती सिरीसेना यांनी विक्रमसिंगे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.
नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या रनिल विक्रमसिंगे यांच्या हाती दिल्या. २२५ सदस्यांच्या श्रीलंकेच्या संसदेमध्ये विक्रमसिंगे यांच्या यूएनपीने सर्वाधिक १०६ जागा जिंकल्या. तर राजपक्षे यांच्या यूपीएफएने केवळ ९५ जागा जिंकल्या.
आपल्या राजकीय कारकिर्दीत विक्रमसिंगे चौथ्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत. याआधी १९९३-९४, २००२-०४ आणि या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत त्यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली होती.

