एक रुपयात वैद्यकीय सेवा

एक रुपयात वैद्यकीय सेवा

जे. जे. हॉस्पिटल समूहाच्या सेंट जॉर्ज व इतर हॉस्पिटलमध्ये चार वर्षे डॉक्टरकी केल्यावर डॉ. राहुल घुले या तरुण डॉक्टरला समाजासाठी काही करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सरकारी नोकरी सोडली. गरीब पेशंटना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी जागेचा शोध सुरू केला. पण दक्षिण मुंबईतील जागेचे प्रचंड भाडे पाहून योजना बारगळण्याची चिन्हे होती. अशावेळी शिवसेना मदतीला धावून आली. कुलाब्याच्या मच्छ‌मिार नगरातील शिवसेना शाखेची जागा तत्काळ मोफत उपलब्ध करून देण्यात आली. जागा मिळताच डॉ. घुले यांनी स्वांतत्र्यदिनाच्या मुहुर्तावर मच्छ‌मिार नगरात दररोज संध्याकाळी पाच ते सात या वेळेत वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. वैद्यकीय सेवेचे काही तरी मोल असावे म्हणून पेशंटकडून केवळ एक रुपया आकारला जात आहे.

सरकारी हॉस्पिटलमधील सुरक्षित नोकरीला रामराम ठोकून एका तरुण डॉक्टरने समाजसेवेचा विडा उचलला आहे. गरीब पेशंटना आधार देण्यासाठी त्याने कुलाब्यातील मच्छ‌मिार नगरमध्ये फक्त एक रुपयात वैद्यकीय सेवा व औषध उपचार सुरू केले आहेत.

कुलाब्यातील पाच मच्छ‌मिार नगरांमध्ये सुमारे १५ ते २० हजार लोकवस्ती आहे. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने तापाचे पेशंट तसेच डेंग्यू, गॅस्ट्रो, त्वचाविकाराचे प्रमाण अधिक आहे. या दवाखान्यात आलेल्या पेशंटना वैद्यकीय सल्ला व मोफत औषधे मिळतातच, शिवाय एखाद्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आलीच, तर सेंट जॉर्ज किंवा गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास मदतही केली जाते.

जे. जे. हॉस्प‌टिल समुहात काम करताना डॉ. तात्याराव लहाने यांच्या वैद्यकीय सेवेचा आदर्श समोर होता. त्याच मार्गाने गरिबांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *