टांझानियामध्ये एका रहस्यमयी आजाराची भीती पसरली आहे. या आजाराची बाधा झालेल्या लोकांना रक्ताची उलटी होत असून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 50 जणांना या आजाराची लागण झाली आहे. हा आजार फैलावत असताना दुसरीकडे या आजाराबाबत खुलासा करणार्या चुन्या जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना निलंबित करण्यात आले आहे.
किसांदू यांनी सांगितले की, संसर्गाचा तपास करण्यासाठी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र, ही कोणत्याही आजाराची साथ नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे किसांदू यांना निलंबित करण्यातींआले आहे. किसांदू यांनी कारवाई होण्याआधी तुर्कीच्या वृत्तसंस्थेला सांगितले की, या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. त्यांना पोटाचा आणि अल्सरचा त्रास झाला. या रुग्णांना धुम्रपान करण्यास आणि मद्यसेवन न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बाधितांच्या रक्ताच्या नमुन्यांसह आणि पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे. जेणेकरून आजाराची माहिती समोर येईल. किसांदू यांनी सांगितले की, बाधितांचा मृत्यू इफूम्बोमधील एका वॉर्डमध्ये झाला. या वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना रक्ताची उलटी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर, टाझांनियाचे आरोग्य मंत्री डोरोथी ग्वाजिमा यांनी हे प्रकरण फारसे गंभीर नसल्याचे म्हटले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा ठपका ठेवत किसांदू यांना 10 दिवसांसाठी नोकरीतून निलंबित करण्यात आले.
आरोग्यमंत्र्यांनी मेडिकल कौन्सिलला प्रकरणाची पूर्ण चाचणी करण्यास सांगितले आहे. मात्र, साथ फैलावली असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. वर्ष 2018 मध्येदेखील या भागात अशाचप्रकारचा आजार फैलावला होता. अनेकांना ताप, उलटी, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. दरम्यान, टांझानियाचे राष्ट्रपती जॉन मागूफुली यांच्यावर करोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याचा आरोप करण्यात येत आहे