आरोपींकडून ११ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

पायी चालणाऱ्या किंवा शेतात काम करणाऱ्या महिलांना गाठून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना लुटणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत नऊपेक्षा अधिक गुन्हे उघडकीस आले असून, ११ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील सोने चोरल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे पोलिसांनी पाळत ठेवून चंद्रकांत महावीर माने आणि शक्ती सखाराम माने यांना ताब्यात घेतले. हे दोघे कर्नाटक राज्यातील असून, ते कोल्हापूर जिल्ह्यात येऊन चोरी करून पसार व्हायचे.

काही ठिकाणी महिलांना एकटे गाठून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने ते लुटत होते. आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे २३ तोळे सोन्याचे दागिने सापडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अनेक गुन्हे उघडकीस आले. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी हा तपास केला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आणि गृह पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *