ऑगस्टमध्येही तलाव क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने अखेर मुंबईकरांच्या डोक्यावर पाणीकपातीची दहीहंडी बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढच्या आठवड्यात होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीकपातीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईकरांवर १० ते १५ टक्के पाणीकपात लादण्यात येणार असून हॉटेल, क्लब, रेसकोर्स, कारखाने आणि स्टेडियम आदी व्यावसायिक आस्थापनांवर जादा पाणीकपात लादण्यात येणार आहे. त्यामुळे या व्यावसायिक आस्थापनांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
जून महिन्यात चार—सहा दिवस झालेल्या धुवाधार पावसामुळे तलावात प्रचंड पाणीसाठा जमा झाला होता. मात्र त्यानंतर तलाव क्षेत्रात पावसाने म्हणावा तसा जोर धरला नाही. ऑगस्टमध्ये तर तलाव क्षेत्रात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे अद्यापही तलाव क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्के कमी पाणीसाठा जमा आहे. मुंबईच्या सातही तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी जमा होते. आज मात्र ऑगस्ट संपत आला तरी ९,३४,६३८ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. गेल्या वर्षापेक्षा हा पाणीसाठा ३,६५,०२८ दशलक्ष लिटरने कमी आहे. तसेच आता पाऊस येण्याची चिन्हे कमी असून त्यामुळेच पाणी कपात करण्यात येणार असून पुढच्या आठवड्यात त्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्य जलअभियंता अशोककुमार तवाडीया यांनी सांगितले.
कृत्रिम पाऊस नाहीच पावसाने तलावक्षेत्रात पाठ फिरवली असली तरी यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार नाही. २००९ मध्ये महापालिकेने केलेल्या कृत्रिम पावसाचा फारसा उपयोग झाला नाही. तसेच राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला होता. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार नाही. या प्रयोगासाठी खर्च खूप येतो. त्यामानाने पाऊस खूप कमी पडतो, असे जलखात्याच्या एका अधिकार्याने सांगितले. – जलसाठ्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार दहा ते पंधरा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. – मुंबईकरांना कमी दाबाने पाणीपुरवठा करणार. – पाण्याच्या वेळा तासाने वा मिनिटांनी कमी करण्यात येणार. – व्यावसायिक आस्थापनाला जादा पाणीकपातीचा लगाम घालणार.

