मुंबई लोकल वेळेचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई

आजपासून मुंबई लोकल (Mumbai Local) ची दारं सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाकडूनही सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

मुंबई लोकलमध्ये ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रवास केल्यास तुम्हाला याची शिक्षा होऊ शकते. निर्धारित वेळेतच प्रवास न केल्यास 200 रुपये दंड आणि 1 महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळं रेल्वेनं प्रवास करताना वेळेचं भान ठेवणं यापुढे अतिशय महत्त्वाचं असणार आहे.

पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून अखेरच्या लोकलपर्यंत सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा असेल. पण, यादरम्यानच्या वेळांमध्ये परवानगी नसतानाही प्रवास करणाऱ्यांना शिक्षा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *