अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या सुटकेसाठी रशियात हजारो लोक रस्त्यांवर

कैद करण्यात आलेले विरोधी पक्षाचे नेते अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी, अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक रविवारी रशियाच्या रस्त्यांवर उतरले. या आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २३०० लोकांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले. या देशव्यापी आंदोलनामुळे क्रेमलिन हादरले आहे.

रशियात गेल्या काही वर्षांमध्ये एका व्यापक असंतोष प्रथमच दिसून आला आहे. हजारो लोक गेल्या आठवडाअखेरीस झालेल्या या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर, ही निदर्शनांची लाट थोपवण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन, समाजमाध्यम गटांना इशारे देऊन आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवूनही, रविवारी अनेक शहरांमध्ये हे आंदोलन पसरले.

पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेले ४४ वर्षांचे नवाल्नी हे १७ जानेवारीला जर्मनीहून परतताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्यानंतर जर्मनीत त्यांनी ५ महिने उपचार घेतले. हा विषप्रयोग रशियाच्या उच्चपदस्थांनीच केल्याचा त्यांचा आरोप आहे. पॅरोलच्या अटींचा भंग केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. अमेरिकेने नवाल्नी यांची सुटका करण्याचे आवाहन रशियाला केले असून, दडपशाहीचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *