मोबाइलमध्ये मृत्यू कसा होतो पाहिलं अन् विद्यार्थ्याने…;

मोबाइलमध्ये मृत्यू कसा होतो पाहिलं अन् विद्यार्थ्याने…;

मोबाइलच्या आहारी गेलेली मुलं काय करु शकतात याचा प्रत्यत जळगावमधील एका घटनेने आला आहे. मोबाइलमध्ये एका वेबसाइटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि गळफास घेऊन मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकारामवाडीमधील हर्षल उर्फ सोन्या दीपक कुंवर (१३) रा. शिंदखेडा ता. धुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथील रहिवासी होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे.

मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने खासगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाईलमध्ये त्याने एक वेबसाइट ओपन करून मृत्यू कधी होणार असा सर्च करत स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचं दिसून आलं. तसंच यानंतरही त्याने यूट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचं दिसून आलं. मोबाईलमध्ये वेबसाइट बघितल्यानंतर आजी काही वेळासाठी बाहेर जाताच हर्षलने मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे.

मयत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. दिपक कुंवर यांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. तर हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाहास मदत करते. एकुलत्या एक हर्षलच्या हट्टापायी तिने त्याला पैसे नसल्याने हप्त्यांवर पैसे परतफेडीच्या हिशोबाने काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता. मात्र मुलाचा हा नवीन मोबाइलचा हट्ट आणि हा मोबाइलच मुलाच्या मृत्यूस कारणीभूत होणार आहे याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *