महाबळेश्वरचे भौगोलिक स्थान आणि हवामान हे गहू लागवडीसाठी पोषक असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून गव्हाच्या लागवडीचे विविध प्रयोग केले जातात. यातूनच येथे गव्हावर संशोधन करण्यासाठी ‘गहू गेरवा’ या संस्थेचीही स्थापना करण्यात आलेली आहे.
मोहाली येथील संशोधन केंद्रामध्ये डॉ. मोनिका गर्ग या कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाचे हे नवीन वाण शोधून काढले आहे. जपान येथील काळा गहू व भारतीय गव्हाचा संकर करत ही नवीन जात तयार केली आहे. या काळय़ा गव्हाची महाबळेश्वर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर पेरणी करण्यात आली आहे.
एक गुंठय़ाला एक किलो याप्रमाणे दोनशे किलो बी पेरण्यात आले आहे. अजून दोनशे किलो बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. या गव्हाच्या बियाण्याचा दर एकशे वीस रुपये प्रति किलो असा असून वाहतूक खर्चासह त्यास किलोमागे दीडशे रुपये दर पडत आहे.

