लाकडातून साकारले बाप्पा

लाकडातून साकारले बाप्पा

कल्याण येथील कासारहाट परिसरातील श्री बाल गणेश मित्र मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदा गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाची अनोखी मूर्ती एकाच लाकडाच्या ओंडक्यापासून निर्माण केली आहे.

त्यासाठी दक्षिण अफ्रिकेतून जलमार्गाने गुजरातच्या कांडला बंदरात सहा महिन्यांपूर्वी सीवान लाकडाचा आठ फूट लांब व चार फूट रुंदीचा अखंड ओंडका मागवण्यात आला.कारागिरांनी या अखंड ओंडक्याला आता श्रीगणेशाच्या सुंदर मूर्तीचे रुप दिले आहे. रंगकलेचे काम पूर्ण झाल्यावर ही मूर्ती मंडळाच्या कार्यालयात कायमस्वरुपी ठेवली जाणार आहे.

गुजरात मधील नाडियाड भागातून १२ तासांच्या प्रवासानंतर या गणेशमूर्तीचे कल्याणात आगमन झाले. ही माहिती मंडळाचे जेष्ठ विश्वस्त गोपाळ चौहान यांनी दिली. जुन्या कल्याणातील कासारहाट परिसरात १९६६ मध्ये स्थापन झालेल्या श्री बाल गणेश मित्र मंडळाचे सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू आहे.

या वर्षाचे औचित्य साधून मंडळाच्या तिन्ही पिढय़ातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन यंदाच्या गणेश उत्सवात अखंड लाकडाची मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला. गुजरात येथील लाकडच्या कलाकुसरीत कारागिर बंधू जीवनभाई मिस्त्री, पुराणभाई मिस्त्री यांच्या कारखान्यातून अशी मूर्ती आणण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील एका लाकडाच्या वखारीतून सिवान जातीच्या लाकडाचा मोठा ओंडका गुजरातमध्ये नाडियाडमधील कारखान्यात आणला गेला.

या ओंडक्यातून गणरायाचे चौरंगावर विराजमान झालेल्या प्रस्तावित बैठय़ा मूर्तीचे काम सुरू करण्यात आले.  तब्बल चार महिन्यात कारागिरांनी या ओंडक्याला सुबक मूर्तीचा आकार दिला. साडेसहाशे किलोच्या या लाकडाच्या ओंडक्याला गणरायांचा आकार देण्याआधी जीवनभाई मिस्त्री व त्यांच्या कुटुंबियांनी पूजा केली. त्यानंतर मूर्ती साकारण्याचे काम सुरू झाले. ओंडक्यातील लाकडी मूर्ती मजबूत होण्यासाठी त्यावर प्रक्रियाही करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेतून ६५ हजार रुपये किंमतीचे हे लाकूड गुजरात कच्छमधील कांडला बंदरापर्यंत पोहचवण्यासाठी २५ हजार रुपये भाडे आकारण्यात आले. अशी माहिती मंडळाचे कोषाध्यक्ष संतोष धबडे यांनी दिली. मंडळातील ४० कार्यकर्त्यांनीच वर्गणी काढून या गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. कल्याणातील गणेश मूर्तीकार शेखर ईश्वाद यांच्या कुंचल्यातून या गणेशमूर्तीत रंग भरले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *