बुधवारी सकाळी आठच्या सुमारास पाच कुत्र्यांनी काळविटांच्या खंदकामध्ये प्रवेश करून, काळविटांवर हल्ला केला. मृत काळविटांपैकी दोन काळविटांवर कुत्र्यांच्या हल्ल्याचे व्रण आहेत. मादीवर मोठा हल्ला झाला असून, चौथ्या काळविटाचा भेदरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या ठिकाणी असलेल्या तलावातील जलपर्णी काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे चार कर्मचारी काळविटांच्या खंदकामध्ये गेले. या वेळी त्यांना तीन कुत्री तेथे सापडली. या कुत्र्यांना काळविटांच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. दोन कुत्री तेथून गायब झाली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही कुत्री संग्राहलयातच असून, ती इतर प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.
या ठिकाणी ड्रेनेज लाइनचे काम जुलैपासून सुरू असून, ते पूर्ण झालेले नाही. अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करून, ही कामे वेळेत का पूर्ण झाली नाहीत, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व घटनेमध्ये निष्काळजीपणा आढळ्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही खेमनार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

