करोना विषाणूची साथ आणि टाळेबंदी यामुळे दोन ते तीन महिने थांबलेली पुस्तक निर्मिती पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न करोनानेच निकाली काढला आहे. करोना विषाणू आणि चीन या विषयांवर मराठीत विपुल पुस्तके प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहेत. करोनामुळे आलेल्या संकटात संधी शोधून साहित्य व्यवहाराचा प्रवाह वाहता ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
‘करोना विषाणूची शास्त्रीय माहिती, साथीचे आजार, विज्ञान, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, चीन देशाचे अंतरंग अशा विषयांवरील पुस्तके वाचकांच्या भेटीला येत आहेत. करोना विषाणूची शास्त्रीय माहिती आणि चीन देश समजून घेण्यासाठी वाचकांकडून पुस्तकांची विचारणा होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले आणि वासुदेव कुलकर्णी यांचे ‘ड्रॅगनचे करोनास्त्र’ हे पुस्तक गंधर्व वेद प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले असून, चीनबद्दलची समाजातील भावना पाहता हे पुस्तक चर्चेत आहे. चंद्रकला प्रकाशनातर्फे शशिकला उपाध्ये यांचे ‘करोना डायरी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्सने माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ‘सत्यकथा करोना विश्वयुद्धाची’ हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, करोनाकेंद्रित राजकारण, समाजकारण, अर्थकारण व धर्मकारण या विषयांची पुस्तकात सांगोपांग चर्चा आहे.
रोहन प्रकाशनातर्फे ‘लव्ह इन टाइम ऑफ करोना’ हा करोना काळातील विविध नात्यांमधील प्रेमसंबंधांवरचा कथासंग्रह प्रकाशित केला जाणार असून, हा वेगळा प्रयोग ठरण्याची शक्यता आहे. चीन म्हणजे काय हे सांगणारे ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचे पुस्तकही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
राजहंस प्रकाशनातर्फे करोनाच्या कृष्णछायेत हे माझे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. करोना विषाणूच्या विविध पैलूंची माहिती, विषाणूचा जन्म कसा झाला, विविध देशांनी कसा सामना केला, देशावर काय परिणाम झाला, कोण यशस्वी ठरले, भू राजकीय गणितं काय आहेत आणि करोनानंतरचे जीवन कसे असेल अशा विषयांवरील सोप्या शब्दांतील माहिती पुस्तकात वाचायला मिळेल.
मेहता प्रकाशनातर्फे ‘करोना नको ना’ हे डॉ. अनिल गांधी यांचे ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले आहे. चीनची घुसखोरी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच वाचायला मिळणार आहे.
मानसिक स्वास्थ्य कसे सांभाळावे, या विषयावर आनंद नाडकर्णी यांचे तसेच साथीचे आजार आणि विज्ञान या विषयावरचे डॉ. बाळ फोंडके यांचे पुस्तक मनोविकास प्रकाशन प्रसिद्ध करणार आहे. करोनावरील महेश शर्मा यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद साकेत प्रकाशन करत आहे. अनुबंध प्रकाशनातर्फे संजय सोनवणी लिखित प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकात करोनाचे परिणाम, धोके आणि संधी याबाबतचा आढावा असेल. दिलीपराज प्रकाशनातर्फे डॉ. अविनाश भोंडवे यांचे ‘करोनाचा चक्रव्यूह’ हे पुस्तक प्रसिद्ध होणार असून, करोनाबद्दलच्या लेखांचे संकलन असलेले पुस्तक डायमंड पब्लिकेशन प्रसिद्ध करत आहे. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे डॉ. बाळ फोंडके यांचे ‘करोनाष्टक’ हे पुस्तक लवकरच येत आहे. लोकवाडमय प्रकाशनातर्फे करोनावर पुस्तक येणार आहे.