सांगलीतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने लग्नाच्या भूलथापा देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला अपत्य झालं. त्यानंतर तरुणानं लग्नास नकार दिला. पीडित तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. पृथ्वीराज पाटील (रा. निंबवडे, ता. आटपाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी पाटील याला रविवारी रात्री उशिरा अटक केली.
विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील पृथ्वीराज पाटील हा सांगलीतील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयातील नर्सिंग विभागात पीडित तरुणी शिकते. तरुणीशी ओळख वाढविल्यानंतर पृथ्वीराज याने त्या तरुणीशी जवळीक साधली. कालांतराने या दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पृथ्वीराज पाटील याने विश्रामबाग परिसरात तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या तरुणीला अपत्यही झाले. त्यानंतर तरुणीने पृथ्वीराज याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, त्याने तिला लग्नास नकार दिला. त्याने त्या तरुणीशी संपर्क तोडला. फसवणूक आणि लैंगिक अत्याचार झाल्याने पीडित तरुणीने रविवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, पृथ्वीराज पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे करत आहेत.