कोरोना प्रतिबंधक काळात सत्कार भोवला; भाजप पदाधिकाऱ्यांसह 40 जणांवर गुन्हा

सध्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकरिता लॉकडाऊन करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याकडं कानाडोळा करत वर्ध्यात भाजप कार्यालयात नवनियुक्त भाजप नेत्याचा सत्कार सोहळा घेण्यात आला. हा सत्कार संबंधिताना चांगलाच महाग पडला असून 35 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये भाजपच्या 10 ते 12 पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

वर्धा जिल्ह्याच्या भाजप कार्यालयात नव्याने जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सचिवपदी निवड झालेल्या राजेश बकाने यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. ही माहिती मिळताच तहसीलदार यांनी पोलिसांना माहिती देत चौकशी करण्यास सांगितलं. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाताच कार्यक्रम सुरू असल्याच निदर्शनास आल. नंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला. बकाने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असून विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढली होती.

पोलिसांनी याप्रकरणी भाजप शहर अध्यक्ष पवन परियाल, प्रशांत इंगळे, गुडू कावळे, सुनिता ढवळे, मंजुषा दुधबडे, प्रशांत बुर्ले, विरु पांडे, निलेश किटे, नगरपालिका उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, श्रीधर देशमुख, गिरीष कांबळे, अशोक कलोडे व इतर 35 ते 40 कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलमचे उल्लंघन, जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा दोन लाखांवर
राज्यात आज 6 हजार 555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 6 हजार 619 इतकी झाली आहे. आज नवीन 3 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 86 हजार 40 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 151 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *