कोविड-१९चे उपचार करताना बिल जास्त आकारल्याने नानावटी रुग्णालयावर मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली. त्यानंतर नानावटी रुग्णालयावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. कोरोनाकाळात जास्त बिल आकारल्याचा हा पहिलाच गुन्हा आहे.
कोरोनाचा फैलाव होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर वेळेत आणि कमी पैशात उपचार व्हावेत, म्हणून राज्य सरकारने काही नियम आणि दर आखून दिले आहेत. सरकारी दरपत्रकानुसार बील न आकारता मनमानी पद्धतीने बिल आकारणी केल्याने सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये नानावटी रुग्णालयाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. मुंबई महापालिकेच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.
कोविड-१९ रुग्णांवरील उपचारासाठी जास्त बिल आकारले जात असल्याच्या प्रचंड तक्रारी मुंबई पालिकेकडे येत होत्या. त्यामुळे कारवाई केल्याचे आएएस अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी माहिती दिली. रुग्णालयाने १७ लाख रुपयांपर्यंत बिले आकारली जात असल्याची माहिती आहे.
एका मृत कोविड-१९ रुग्णाचे बिल ६ लाख ८५ हजार केले आणि बिल भरल्याशिवाय संबंधित रुग्णाचा मृतदेह दिला जात नव्हता, अशी तक्रार आल्यानंतर या केसच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले.