कराची स्टॉक एक्स्चेंजवरील हल्ल्यानंतर मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देऊ, अशी धमकी देणारा दूरध्वनी सोमवारी पोलिसांना आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. कालच कराचीतील Karachi Stock Exchange इमारतीवर दहशतवादी हल्ला झाला होता. पोलिसांच्या गणवेशातील चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडस फेकले. यानंतर दहशतवाद्यांनी इमारतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरु होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घातले होते.