ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ज्या विभागामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढते, त्या विभागामधील नागरिकांनी हा परिसर स्वतःहून सात दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील पुढील सात दिवस या परिसरात कडकडीत बंद पाळण्यासंदर्भातल्या सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत. ठाणे शहरातील बाळकुम, ढोकाली, कोलशेत परिसरात उद्यापासून 7 दिवसांसाठी नागरिकांनी स्वयंघोषित लॉकडाऊन जाहीर केला आहे. या परिसरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या परिसरातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन नागरिकांना विश्वासात घेऊन हा संपूर्ण परिसर सात दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित वाढत असल्यामुळे संपूर्ण शहर लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा सध्या नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर आणि सोशल माध्यमातून फिरत आहेत. मात्र यासंदर्भात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. जरी ठाणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही ज्या विभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, त्याच विभागातील नागरिकांसाठी कडक नियम करण्यासंदर्भात प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र लोकांनी याचा धसका घेतला असून लोक विविध ठिकाणी साहित्य घेण्यासाठी बाहेर पडत असल्याचे दृश्य ठाण्यात पाहायला मिळतंय. बाळकुम, ढोकाली, कोलशेत या परिसरातील नागरिक स्वतःहून आपापले विभाग बंद करण्याची विनंती प्रशासनाकडे करत आहेत. असं असलं तरीही नागरिकांनी उद्यापासून पुढील सात दिवस हा परिसर बंद असल्याचं घोषित करून टाकलंय. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीसाठी पुढील सात दिवस बाहेर पडू नये, असे आवाहनही या परिसरातल्या नागरिकांसाठी करण्यात येत आहे.
संपूर्ण ठाण्यातील लॉकडाऊनच्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिथं हॉटस्पॉट आहेत, तिथे कडक नियम करण्याचे आदेश दिले आहेत. ते काम सुरू आहे. याव्यतिरिक्त महापालिका आयुक्त याबाबत उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली आहे.
सध्या ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरातील रूग्णांची वाढती संख्या बघता, आता सोशल मीडियावर अफवांचं पीक वाढलं आहे. ठाण्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन होणार. कल्याण-डोंबिवलीत एसआरपीएफ बोलवली जाणार अशा आशयाचे मेसेजेस व्हॉट्सअॅपवर फिरू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीवजा संभ्रम पसरला आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुठ्ल्याही प्रकारे लॉकडाऊन किंवा लष्कर बोलवण्याचा निर्णय झाला नाही. कन्टेन्मेंट झोन्समध्ये कडक लॉकडाऊनचं पालन करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जातील. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण शहर लॉकडाऊन केलं जाईल अस ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
ठाणे जिल्ह्यात जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी याची धास्ती घेऊन अनेक जण सोशल मीडियातून वेगवेगळ्या अफवांचे पीक पेरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर ज्या ठिकाणी ज्या विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याच विभागात कडक नियम करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.