गावबंदी केल्याने तरुणाला राहावे लागत आहे जंगलात एका टेम्पोमध्ये !

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच संचारबंदीही लागू आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने अनेक जण आपल्या गावी परतत आहेत. काही जण घरी पोहोचले आहेत. तर काहींना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. मात्र, असे असताना एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. माणूसकी लोप पावल्याचे बोलके चित्र जिल्हयात पाहायला मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेला असल्यामुळे ग्रामस्थांनी गावात राहण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे  केळशी गावातील एका युवकावर जंगलामध्ये टेम्पोमध्ये राहण्याची वेळ आली आहे. गेले चार दिवस हा युवक टेम्पोमध्ये राहत असून त्यांच्यासाठी  ते त्याचे घर बनले आहे.

केळशी कुंभारवाडा येथील साहिल तळदेवकर हा युवक खेड येथे नोकरीकरिता असतो. त्याचे कुटुंब केळशी येथे राहते. लॉकडाऊनच्या काळात हा युवक खेड येथून आपल्या गावी आल्यावर त्याच्या घरी राहण्यावर वाडीतील लोकांनी आक्षेप घेतला. यानंतर वाडीची बैठक बसली बैठकीमध्ये या युवकाच्या भावाला जर तुमच्या घरात वेगळे संडास-बाथरुम वापरण्याकरिता असेल तरच याला वाडीत ठेवा असा निर्णय सांगण्यात आला. तसेच हा निर्णय गावचा असल्याचे सांगण्यात आले. नाईलाजाने या युवकाला वाडीतून बाहेर पडावे लागले

मात्र, त्यांचे गावात अन्य घर नसल्याने त्याला गावातील एका जंगलात टेम्पोमध्ये राहण्याची वेळ आली. येथे त्याला दररोज जेवणासाठी डबा आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र अन्य कोणतीही सुविधा जंगलामध्ये नसून साधा लाईट देखील नसल्याने रात्री मच्छर फोडून काढतात, असे या युवकाने सांगितले.

याबाबत केळशी कुंभारवाडा वाडीअध्यक्ष संतोष खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली. मात्र, हा युवक सध्या कुठे आहे याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. गावच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आपण वाडीमध्ये हा निर्णय घेतला. मात्र आपण या युवकाला जंगलात राहण्याचा सल्ला दिलेला नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले. या घटनेमुळे तालुक्यातील माणुसकी आता हळू हळू लोप पावत चालली असल्याचे समोर आले आहे.

कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना तर करायला हवी. पण माणुसकीही जपायला हवी. रत्नागिरीच्या एका गावात घडलेल्या घटनेत कोण चूक, कोण बरोबर हे ठरवणं कठीण आहे. कारण कोरोनामुळे धास्तावलेल्या गावकऱ्यांनी बाजुच्या तालुक्यातून आलेल्या तरुणाला त्याच्या नातेवाईकांच्या घरात राहण्यास आक्षेप घेतला. मग या तरुणाला जवळच्या जंगलात एका टेम्पोमध्ये मुक्काम करावा लागला. कोरोनापुढे माणुसकी हरली. गाव करील ते राव काय करील ? असं म्हणतात. पण या गावाला ते का जमलं नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *