करोना विषाणूंशी लढा देत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोना योद्धे म्हणून ओळखले जात आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात नर्स असलेल्या छाया संजय रसाळ या अशाच एक करोना योद्धा आहेत. त्यांचे १४ दिवसानंतर आपल्या घरी आगमन झाले. यावेळी त्यांच्या कामाचे कौतुक करताना सोसायटीतील लोकांनी औक्षण करीत, फुले उधळत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
काही वर्षांपासून छायाताई ससून रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. थायरॉईड आणि ब्लड प्रेशरचा आजार असतानाही त्यांनी सध्याच्या करोनाच्या संकटकाळी आपलं कर्तव्य चोखपणे बजावलं आहे. करोनाची बाधा होण्याचा अधिक धोका असतानाही ते करोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून त्या कुटुंबापासून दूर होत्या. आज मोशी येथील आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
छायाताईंना सात दिवस ड्युटी आणि सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहावं लागतं. त्यानंतर त्यांना एक दिवस घरी पाठवलं जात. कुटुंबासमवेत वेळ घातल्याने त्यांना पुन्हा काम करण्यास ऊर्जा मिळते. दरम्यान, सध्याच्या करोनाच्या काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, नेहमी सकारात्मक विचार करावा, अशा शब्दांत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
