मुंबईवर 26/11 चा हल्ला करणारे 10 दहशतवादी समुद्रीमार्गाने आल्यानंतर किनारी भागातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र तटरक्षक दलाच्या 450 पोलिसांपैकी अर्ध्याहून अधिक, म्हणजेच तब्बल 230 पोलिसांना स्विमिंग येत नसल्याचं एका अहवालात निष्पन्न झालं आहे. समुद्री सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या एका ऑडिटमध्येच ही बाब उघड झाली आहे.
‘230 पोलिसांना स्विमिंग येत नाही, किंवा त्यांना पोहण्याची भीती वाटते. आम्ही त्यांना ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली’ अशी माहिती एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. मुंबईच्या 114 किमी लांब किनारपट्टीची सुरक्षा पोलिसांच्या प्राधान्यक्रमावर आहे. त्यांना किनाऱ्यासोबतच 12 नॉटिकल माईल्स आतपर्यंत देखरेख करावी लागते.
‘मराठवाडा आणि विदर्भातून आलेल्या पोलिसांनी समुद्र प्रत्यक्षात पाहिलेला नसतो, त्यामुळे त्यांचं पोस्टिंग झाल्यास साहजिकच त्यांना दडपण येतं’, असंही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. ‘त्यांचं स्विमिंगचं ट्रेनिंग पूर्ण होतं तोच त्यांची बदली होते, त्यामुळे त्यांच्यावर खर्च झालेला पैसा, वेळ, मेहनत फुकट जातं’ असंही निरीक्षण नोंदवलं जात आहे.
त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा बाबत सरकार गांभीर्याने विचार करणार की सुरक्षा रामभरोसे आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

