बेळगावातील झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

बेळगावातील झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

बेळगावातील कुवेंपूनगर भागात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश पोलिसांनी अवघ्या 12 तासात केला आहे. 37 वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या करणाऱ्या प्रवीण भट्ट या 23 वर्षीय प्रियकराला पोलिसांनी अटक केलं आहे.

रीनाचे कुवेंपूनगरमधील त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या प्रवीण भट्ट या सीएचा अभ्यास करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाशी वर्षभरापासून सुत जुळले होते. पती गावाला गेल्यावर रीना प्रवीणला फोन करुन घरी बोलावून घेत असे. मात्र प्रविणने अनैतिक संबंध संपवण्याची मागणी केली. संबंध तोडण्यास रीनाने नकार दिला आणि हत्याकांड घडलं.

मयत रीनाचा पती राकेश मालगती यांचा कापडाचा व्यवसाय आहे. राकेश यांचा भाऊ  परदेशातून आला असल्याने ते गेले दोन दिवस आपल्या भावासमवेत गोव्याला फिरायला गेले होते.

पती राकेश घरी नाही म्हणून शनिवारी मध्यरात्री रीनाने आरोपी प्रवीणला फोन करुन घरी बोलावले. त्यावेळी टेरेसवर त्यांनी बराच वेळ घालवला. त्यानंतर प्रवीण आपल्या घरी निघून गेला. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास रीनाने प्रवीणला पुन्हा बोलवून घेतले.

प्रवीण टेरेसमार्गे पुन्हा त्यांच्या घरी आला आणि त्याने रीनाला आपले अनैतिक संबंध संपवूया असं सांगितले. यावेळी रीनाने संबंध तोडायला नकार दिला. त्यामुळे रीना आणि प्रवीणमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या प्रवीणने रागाच्या भरात रीनाच्या गळ्यावर चाकूने वार केले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे रीनाचा जागीच मृत्यू झाला.

भांडणाचा आवाज ऐकून रीनाच्या बाजूला झोपलेली मुले आदित्य आणि साहित्या हे दोघे जागे झाले. प्रवीणने आधी साहित्याला बाथरुममध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत बुडवून मारलं, तर आदित्यचा दोरीने गळा दाबून हत्या केली.

शनिवारी रात्री राकेशच्या घरी रीनाचा 16 वर्षांचा भाचा हर्ष रेडेकरही आला होता. मात्र तो  फुटबॉल खेळून दमल्यामुळे रात्री 10 वाजता जेवून झोपला. त्याच्या खोलीला बाहेरुन कडी घालण्यात आली होती.

सकाळी 8 वाजता जाग आल्यावर हर्षने रीनाच्या पतीला मेसेज करुन कळवले. रीनाच्या पतीने बेळगावातील आपल्या मेहुण्याला घरी जाण्यास सांगितले आणि त्यानंतर तिहेरी हत्याकांड उघडकीस आले.

घटनास्थळावरुन रीनाचा मोबाईल गायब होता. रीनाच्या मोबाईलवरुन शेवटचा फोन कोणाला गेला होता याचा तपास करुन पोलिस प्रवीण भट्टपर्यंत पोचले आणि त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *