धूम्रपानामुळे करोना संसर्गाचा मेंदूला असलेला धोका वाढतो असे जोधपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)म्हटले आहे. या संस्थेच्या वैज्ञानिकांनी घातक करोना विषाणू चेतासंस्थेला कितपत घातक ठरतो याचे संशोधन केले आहे.
लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांमध्ये अनेकदा वास व चव संवेदना गमावली जाण्याची शक्यता असते. त्यांनी लगेच स्वत:ला विलगीकरणात ठेवणे गरजेचे असून डॉक्टरांना भेटणेही महत्त्वाचे आहे, असा इशारा या संशोधनात देण्यात आला आहे.
‘न्यूरोलॉजिकल इनसाइट्स ऑफ कोविड १९’ या अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे की, ज्यांना कोविड १९ चा संसर्ग होतो त्यांच्या केंद्रीय चेतासंस्थेलाही धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे त्यांच्या वास व चव या संवेदना कमी होतात.
जोधपूर आयआयटीचे प्राध्यापक सुरजित घोष यांनी म्हटले आहे की, करोना विषाणू हा मानवी शरीरातील एचएसीइ २ म्हणजे ‘ह्य़ूमन अँजियोटेन्सिन कनव्हर्टिग एनझाइम २’ या संग्राहकाशी क्रिया करतो तेथूनच तो विषाणू प्रवेश करतो. नाकातील श्लेष्मल द्रव, मानवी शरीराचे सर्व अवयव यात विषाणू पसरू शकतो. मेंदूतही वर उल्लेख केलेल्या संग्राहकाच्या माध्यमातून हानी होते.
धूम्रपानामुळे करोनाचा संसर्ग मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता अधिक असते कारण मानवी संग्राहक व निकोटिन संग्राहक यांच्यात वेगवेगळ्या आंतरक्रिया होऊन गुंतागुंत वाढते. दोन्ही संग्राहक एकदम क्रियाशील झाल्याने जेव्हा व्यक्ती धूम्रपान करते, तेव्हा एचएसीइ २ चा प्रभाव वाढतो कारण त्याला निकोटिनमुळे प्रेरणा मिळते. कोविड १९ रुग्णांचे शवविच्छेदन करताना धूम्रपान करणारा व न करणारा अशी वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे करोनाचा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर काय परिणाम होतो याचा उलगडा होईल.
करोनामुळे हानी
मेंदूत वास ग्रंथीशी संबंधित घटक असतात त्यामुळे आपल्याला वास येतो. करोनाच्या लक्षणे नसलेल्या रुग्णांना वासाची संवेदना राहत नाही याचे एक कारण त्यांच्या केंद्रीय चेतासंस्थेपर्यंत विषाणू संसर्ग पोहोचतो हे आहे. कोविड १९ रुग्णाच्या मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यात ‘एएनइ’ नावाचा मेंदूविकार दिसून आला. याचा अर्थ एसीइ २ हे संग्राहक मेंदूत असतात, ते विषाणूला प्रतिसाद देतात परिणामी मेंदूला धोका निर्माण होतो. त्यामुळे मेंदूच्या कार्यातही बिघाड होतो. वास ग्रंथीतून हा संसर्ग मेंदूत पसरतो. मेंदूच्या मागच्या बाजूकडील मेडय़ुला ओबलोंगाटा या भागाला मोठा धक्का बसतो, याच भागातून श्वास, हृदय व रक्तवाहिन्यांच्या कार्याचे नियंत्रण होत असते.
