दिल्लीमध्ये ‘चिकन’वरुन झाला राडा, विक्रेत्याचा चाकूने वार करुन केला खून

दिल्लीमध्ये एका चिकन विक्रेत्याचा चार आरोपींनी चाकूने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. २९) ही घटना दिल्लीच्या जहांगीरपुरी परिसरात घडली.

शिराज असे मृताचे नाव असून तो मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी होता. शिराज आधी मासे विकायचा , पण लॉकडाउनमुळे उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने घरासमोर छोटा स्टॉल लावून चिकन विकायला सुरूवात केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. “चिकन विक्रीसाठी 35 वर्षीय शिराजने आपल्या झोपडीसमोर छोटा स्टॉल उभा केला होता. बुधवारी आरोपींपैकी एक जण त्याच्याकडे चिकन खरेदीसाठी आला आणि त्याला दर विचारला. शिराजने चिकनचा दर सांगितल्यानंतर आरोपीने, बाजारभावापेक्षा जास्त दराने विक्री करत असल्याचं म्हणत शिराजसोबत वाद घालायला सुरूवात केली. थोड्यावेळाने आरोपीचे तीन भाऊ देखील तिथे पोहोचले आणि त्यांनी चाकू व लोखंडी रॉडच्या सहाय्याने शिराजला मारहाण केली”, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजयंता आर्या यांनी दिली.

“पोलिसांना दुपारी चार वाजता घटनेबाबत माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर शिराजला उपचारासाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शाह आलम नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, अन्य तीन फरार आरोपींचाही शोध सुरू आहे”, अशी माहितीही विजयंता आर्या यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *