आमदाराच्या पत्रावर संगमनेरला आलेली तरुणी पुन्हा मुंबईला रवाना

मुंबईतील एका भाजपच्या आमदाराच्या पत्राच्या मदतीने शिवडीतून एका तरुणीने खास वाहनातून संगमनेरपर्यंतचा प्रवास केल्याची धक्कादायक माहिती आहे. संगमनेरात तिला थांबण्यास स्थानिकानी विरोध केल्यानंतर तिने पुन्हा मुंबईची वाट धरली. एकीकडे वाधवान कुटुंबीयांचा प्रकार समोर असताना आता थेट भाजप आमदाराच्या पत्रावर संगमनेरपर्यंतचा तिचा प्रवास विनाअडथळा झाल्याचे समोर आले आहे.

संगमनेरमध्ये शिक्षण घेत असलेली एक तरुणी शिवडीत (मुंबई) राहते. लॉकडाऊन दरम्यान प्रवासासाठी जिल्हाबंदी असताना तिने आमदार महोदयांच्या पत्रावर संगमनेर गाठले. ती राहत असलेल्या ठिकाणी गेली असता ती मुंबईतून आल्याचे माहिती असल्याने घरमालकाने तिला घराची चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे तिने घरमालकाशी हुज्जत घातली. याची माहिती प्रशासनाला देण्यात आल्यानंतर तेथे महसूल खात्याचा एक कर्मचारीदेखील आला. मात्र संबंधित तरुणीने त्यालादेखील पत्र दाखवत गप्प केले. दरम्यान संबंधित तरुणीला त्याने रुग्णालयात तपासणीसाठी चलण्याचा आग्रह केला. मात्र त्या तरुणीने तेथे देखील वाद घालण्यास सुरुवात केली. याच दरम्यान तेथे जमलेल्या काही नागरिकांना तिच्या हातावरील ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का दिसल्याने सर्वांनीच तिला तेथे थांबण्यास विरोध केला. त्यामुळे संबंधित तरुणी पुन्हा आलेल्या वाहनातून माघारी फिरली. तर याप्रकरणी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दुजोरा देताना सांगितले की, ही तरुणी संगमनेरमध्ये शिक्षण घेत असून त्यासाठीच ती येथे आली होती. ती परत गेली असली तरी तिने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

कोळंबकरांचे पत्र

संबंधित तरुणीला मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर यांनी प्रवासासाठी पत्र दिले होते. या पत्रात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे तिला शिवडी (मुंबई) ते संगमनेरपर्यंतचा प्रवास २३ एप्रिलला करु देण्यासंदर्भात व प्रवासादरम्यान तिला संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे सुचित केले होते. याच पत्राच्या आधारे संबंधित तरुणी शुक्रवारी संगमनेरमध्ये पोहोचली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *