राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आव्हाड यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
देशात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत कळवा आणि मुंब्रा शहरात ‘कम्युनिट किचन’ उपक्रम सुरू करण्यात आला होता. या माध्यमातून अनेकांना जेवण पुरविण्यात येत होते. मात्र, मुंब्रा येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या निकटवर्तीयांनीही करोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आव्हाड यांचा अहवाल नकारात्मक आला होता. याची माहितीही त्यांनी समाजमाध्यमांवर दिली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत:ला घरातच विलगीकरण करून घेतले होते.
मंगळवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेही प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
