करोनाबाधिताने चालत गाठले विलगीकरण केंद्र!

करोनाग्रस्त रुग्णांची सेवा करताना स्वतः पॉझिटिव्ह झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या भांडुपमधील एका परिचारिकेच्या मुलीला धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. कुर्ल्यातील भाभा रुग्णालयातून कांजूरमार्गमधील विलगीकरण केंद्रात परतण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न केल्याने सोनल (नाव बदलले आहे) या तरुणीला कुर्ल्याहून चालत विलगीकरण केंद्र गाठावे लागले.

भांडुप पश्चिमेकडे राहणाऱ्या एका परिचारिकेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कांजूरमार्ग येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. मात्र, केंद्रात आल्यानंतर घसा खवखवू लागल्याने सोनलला तपासणीसाठी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तपासणीशिवाय तिला बराच काळ बसवून ठेवण्यात आले. तपासणीदरम्यान ‘तुमच्यात करोनाची कुठलीही लक्षणे दिसत नसून, ३-४ दिवसांनी पुन्हा तपास करू’, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा कांजूरमधील केंद्रात सोडण्याविषयीसोनलने परिचारिकेला विचारले असता त्यांच्याकडून होकारार्थी मान हलवण्यात आली. मात्र, पुढील दोन तास रुग्णालय प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे १०८ क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिथेही सोनलच्या पदरी निराशाच आली. ‘विलगीकरण केंद्रातील संबंधित व्यक्तीस पुन्हा घ्यायला या’ असे सांगूनही त्यांनी असमर्थता दर्शवली. या भोंगळ कारभाराला कंटाळून तिने रुग्णालयातील वरिष्ठांशी संपर्क साधला. ‘माझी आई पॉझिटिव्ह रुग्ण असून मलाही त्रास होतो आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णवाहिकेची सोय करा’, अशी विनंती तिने केली. मात्र, ‘आमच्याकडून कुठलीही सुविधा उपलब्ध होणार नाही. तुम्ही सार्वजनिक वाहनाने कांजूरमार्ग गाठा’, असे तिला सांगण्यात आले. अखेर सोनलने रुग्णालय सोडले आणि गूगल मॅपच्या मदतीने चालत कांजूरमार्ग येथील विलगीकरण केंद्र गाठले. हा सारा प्रकार सोनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आणला.

सोनल कुर्ल्याहून चालत आलेली पाहून विलगीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले. तत्पूर्वी, ‘विलगीकरण केंद्रात दोन दिवस कोणी पाणीही विचारले नाही. केवळ जेवताना पाणी दिले जाईल किंवा बेसिनचे पाणी प्या’, अशा सूचना देण्यात आल्या असेही तिने या व्हिडीओमध्ये सांगितले. याबाबत अधिक माहिती घेतली असता, ‘या रुग्णाने रुग्णवाहिका सेवा देण्यापूर्वीच रुग्णालय सोडले’, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे रुग्णवाहिकांची कमतरता, खासगी रुग्णवाहिकांचा आडमुठेपणा तसेच अवाजवी दरआकारणी आणि करोना काळातील एकूणच सार्वजनिक वाहतुकीचा उडलेला बोजवारा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *